इतिहास

आता या संस्थेचा इतिहास म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालापासून कथा सांगावी लागेल.

” कीर्तन ” हा अध्यात्मिक भाषेत नवविधा भक्तीचा एक प्रकार असल्याने त्याचे शिक्षण गुरुकुल परंपरेने घ्यावे लागे . त्यासाठी सन १९४० पर्यंत कीर्तन-प्रेमीना कीर्तन शिकवणारी शाळा उपलब्ध नव्हती. अशी शाळा असावी हा विचारही तेव्हा क्रांतिकारक मानला गेला यात आश्चर्य नाही. ” दादर कीर्तन विद्यालय ” नावाची एक संस्था पूर्वी अस्तित्वात होती असे नुकतेच वाचनात आले, परन्तु त्या संस्थेचे पुढे नक्की काय झाले, याबद्दलचा इतिहास अद्याप उलगडलेला नाही.

नारदीय कीर्तनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन नवीन कीर्तनकार तयार करण्यासाठी १९४० साली श्रावण वद्य पंचमीला या संस्थेची स्थापना द. ल. वैद्य मार्ग. दादर येथें करण्यात आली. संस्थेचे आद्य संस्थापक एक सज्जन श्रीयुत शं. ब. कुलकर्णी आणि हरि भक्ती परायण श्री. गो. ग. भोसेकर बुवा हे होते. ” सामान्यातील असामान्य ” अशा या दोन सज्जनांच्या प्रयत्नातून , संस्था प्रथम एका बांबू- पत्र्याच्या तात्पुरत्या छपराखाली सुरु झाली. तत्पूर्वी मुंबईत कीर्तनासारखा अध्यात्मिक विषय शाळेत शिकण्याचा नव्हताच. त्यावेळचे कीर्तनकार बुवा खासगीरीत्या गुरु-शिष्य परंपरेने शिकवीत असत. कीर्तनाची पाठशाला कीर्तनकार घरीच चालवीत. त्यामुळे कीर्तनाची अशा प्रकारची शाळा ही कल्पनाचं मुळी समाजात नव्याने अवतरली. पूर्वी अभ्यासक्रम ५ वर्षांचा असे. नोकरी उद्योग सांभाळून कीर्तन शिकायला येणाऱ्यांची संख्या तर फारच मर्यादित असे.

! ध्यायन कृते यजन् यज्ञे त्रेतायां द्वापरेर्चनम् !
! यदाप्नोति तदाप्नोति कलौ तत् हरिकीर्तनात् !!

अशी बिरुदावली मिरवित विश्वासाने नारदीय कीर्तनाचा प्रसार , प्रचार आणि प्रशिक्षण या कार्याला वाहून घेतलेल्या अखिल भारतीय कीर्तन संस्थेची सन १९४० मधे सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली . शके १८८० ( सन १९५८ ) विजयादशमीच्य दिवशी त्यावेळी विश्वस्त प्रमुख असलेले सुपरिचित नामदार माजी मन्त्री डॉ. त्रिं . रा. नरवणे याचे शुभ हस्ते नवीन वा्स्तूसाठी भूमिपूजन करण्यात आले. वास्तु निर्माण झाल्यावर शके १८८२ (सन १९६० ) श्रावण वद्य पञ्चमीला श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दानशूर उद्योगपती श्रीमान वामनराव लक्ष्मणराव डहाणुकर यांचे शुभ हस्ते संपन्न झाली .

ह.भ.प. श्री. भोसेकर बुवा, श्री. मारुलकर बुवा , श्री. महाजन गुरुजी , श्री. प्रकाशकर शास्त्री, वझेबुवा, श्री रा. भागवत सर यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे कार्य मोठ्या जिद्दीने आणि तळमळीने केले. संगीताची बाजू श्री. देवधर गुरुजी आणि श्री. ग. बा. साधलेसर यांनी समर्थपणे सांभाळली होती. कीर्तन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी संस्थेत दररोज होणाऱ्या कीर्तन प्रवचन कार्यक्रमासाठी येणाऱ्या श्रोत्यांची संख्या मोठी असे.

सन १९६० साली तत्कालीन कार्यकारी मण्डलाच्या प्रयत्नाने कायम वास्तूची उभारणी शक्य झाली. तरीही शिकायला येणारे विद्यार्थी कमी असत. आता मात्र पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी कीर्तन शिकायला येतात आणि तांत्रिक प्रगतीमुळे जीवन गतिमान झाले , हे लक्षात घेता, अभ्यासक्रम सन २००० नंतर ३ वर्षाचा करण्यात आला आहे. आधी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच विद्यार्थी संस्थेत शिकण्यासाठी येत. तरीही संस्थेचे काम नेटाने सुरूच राहिले. हल्ली मात्र सुमारे ३० ते ३५ विद्यार्थी दरसाल नव्याने प्रवेश घेत असतात. ही या संस्थेच्या कार्याची एक प्रकारे पावतीच म्हणता येईल.

सन १९९०-१९९४ दरम्यान संस्थेने कीर्तनाच्या पूर्वरंग आणि आख्यानाचे ” कीर्तन रत्नावली भाग १ व २ ” डॉ. ग. शि. पाटणकर यांच्या संपादनाखाली छापून प्रसिद्ध केले, आणि अल्पकाळातच ते लोकप्रियही झाले. चार आवृत्ती मुद्रित करून असे उपयुक्त पुस्तक संस्थेने विद्यार्थ्यांना माफक किमतीत उपलब्ध करून दिले.

सन २००० साली संस्थेच्या वास्तूचे पुनर्निर्माण आणि विस्तार कार्य तत्कालीन अध्यक्ष श्री . सुरेश उपाध्ये आणि सरकार्यवाह श्री किशोर साठे . यांच्या प्रयत्नाने आणि भक्त- भाविकांच्या उदंड सहभागातून पार पडले . आणि संस्था नव्या उत्साहाने या ” देव कार्यासाठी ” सज्ज झाली.

सन २००१ मध्ये कीर्तन विद्यालयाचे नामकरण ” साई सत्चरीत्रकार हेमाडपंत कीर्तन विद्यालय ” असे करण्यात आले.

२००७ मध्ये दूरवर राहणाऱ्या आणि कीर्तन शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ” घरबसल्या कीर्तनकार व्हा ” असा संदेश देत पत्रव्यवहाराने कीर्तन शिकविण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला. त्यासाठी एक खास दूरस्थ अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती ठरविण्यात आली.

आजपर्यंत ४०० हून जास्त विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करून गेले. अनेक जण स्वेच्छेने कीर्तन करू लागले. मुंबई आणि परिसरातील अनेकजण नामवंत कीर्तनकार म्हणून ओळखले जाऊ लागले, देशातच नव्हे तर परदेशात जाऊन कीर्तने-प्रवचने करू लागले, याचा संस्थेला रास्त अभिमान वाटतो. त्यापैकी काहीजण या संकेत स्थळी नोंद करून आपल्या भेटीच्या प्रतीक्षेत आहेत. आपण ” कीर्तनकार सूची ” दालनाला अवश्य भेट द्या.

संस्था आज सक्षम कार्यकर्त्यांच्या जोरावर भरीव कार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. संस्थेचे स्वतःचे विट्ठल मंदिर, कीर्तन शाळा , आणि सुसज्ज सभागृह तसेच संस्थेत होणारे कार्यक्रम , शैक्षणिक वर्ग , व अन्य उपक्रम यांची अवश्य माहिती करून घ्या . त्यासाठी आम्ही आपल्या अगदी जवळच म्हणजे इतर दालनात सदैव तत्पर आहोत.

श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, दादर, मुंबई