All posts by admin

माजी विद्यार्थी कीर्तन महोत्सव

यावर्षी फेब्रु. १८ ते २८ दरम्यान संस्थेच्या माजी विद्यार्थी समूहाने एक कीर्तन महोत्सव सदर करण्याचे योजिले आहे. ११ दिवस होत असलेल्या या समारोहात अनेक जुन्या जाणत्या व नामवंत अश्या कीर्तनकारांची कीर्तने ऐकावयास मिळतील. कार्यक्रमाचे संयोजन पूर्ण झाल्याने आता अनेक माजी विद्यार्थी कीर्तनकार पुढील वर्षाच्या प्रतीक्षा यादीवर ठेवावे लागले असे संयोजकांकडून सांगण्यात आले आहे. कीर्तनप्रेमी आणि कीर्तनकारांचा वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद हे या उपक्रमाचे वैशिष्ठय आहे. नियोजित कार्यक्रमास आमच्या अनेकोत्तम शुभेच्छा.

दास नवमी निमित्त पाठांतर स्पर्धा

दासनवमी निमित्त मनाचे श्लोक आणि दासबोध निवडक ओव्यांची शालेय पाठांतर स्पर्धा तसेच मोठ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन या वर्षीही करण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे हा उपक्रम दादर आणि बोरीवली येथील अनेक शाळातून राबविण्यात येतो. त्याला उत्तम प्रतिसादही मिळतो.

३ गटात ही स्पर्धा घेण्यात येते. १ली ते ४थी साठी ५ मनाचे श्लोक आणि ५वी ते ७ वी आणि ८वी ते १० वी या गटासाठी दासबोधातील निवडक १० ओव्या पाठांतरासाठी दिल्या जातात. दोन्ही केंद्रावर प्रत्येकी सुमारे ४५० विद्यार्थ्यांचा सहभाग आणि स्थानिक समर्थ भक्तांचे सहकार्य हे या स्पर्धेचे वैशिष्ठय आहे.

समर्थ विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे आणि विद्यार्थ्यांना पाठांतराची आवड निर्माण करणे हेच मुख्य उद्देश ठेवून संस्था ही स्पर्धा घेत असते.

संस्थेचे संकेतस्थळ

अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे हे संकेतस्थळ (Website) नुकतेच ( सप्टे/ऑक्टो. २०१२मध्ये ) म्हणजे श्रावण महिन्यात प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आले. बोस्टन, मस्साचूसेट्स अमेरिका स्थित Sanih technologies या संस्थेने हे काम अगदी जलद गतीने केले. (सनि : = संस्कृत अर्थ : भक्ती , सेवा, दिशा, दान , प्रार्थना )

संकेतस्थळाची संकल्पना ठरल्यावर त्याचे आरेखन आणि संगणकीय माण्डणी हे तांत्रिक सोपस्कार व निर्मिती कार्य निष्णात संगणकतज्ञ सौ. सुमेधा संजय जोशी आणि डॉ. संजय मुकुंद जोशी यांनी कीर्तन परंपरेचा आदर आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने मोठ्या आपुलकीने , व कोणताही मोबदला न स्विकारता तत्परतेने पूर्ण करून दिले. त्यासाठी अ. भा. कीर्तन संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश उपाध्ये आणि सरकार्यवाह श्री. किशोर साठे यांचे वेळोवेळी सर्व सहकार्य व मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या कार्यकारी मडळाचे सदस्य श्री. प्रभाकर फणसे आणि श्री. सुरेंद्र फडके यांनी इतिहास संशोधन , माहिती व छायाचित्र संकलनाचे काम चिकाटीने सांभाळले. संकेतस्थळ पाहून संस्थेच्या व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले.

जगभरात सर्वत्र उपलब्ध असलेल्या या संकेत स्थलाचा उपयोग भविष्यात कीर्तन संस्था , कीर्तनकार व सर्व कीर्तनप्रेमी भविकाना हरप्रकारे होत राहिल असा विश्वास आहे.