All posts by admin

अन्य उपक्रम

अ. भा. कीर्तन संस्थेत कीर्तनाशिवाय इतर अनेक उपक्रम वर्षभर सुरु असतात.

१)चैत्र .- नव-वर्षाभिनंदन.ह.भ.प. संपदा निमकर,रत्नागिरी यांची कीर्तन सेवा .
२ वासंतिक हळदीकुंकू, मातृदिनानिमित्त गरजू महिलांना साडी-चोळी प्रदान. वार्षिक परीक्षा आणि निकाल.
३) वैशाख – शालेय मुलांचे संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास शिबीर.ह.भ.प.श्रीराम झारापकर,सिंधुदुर्ग,यांची कीर्तन सेवा.
४) जेष्ठ.- गंगा-दशहरा उत्सव.गंगा लहरी काव्य वाचन.ह.भ.प.शामबुवा धुमकेकर,नागपूर यांची कीर्तन सेवा.
५) वटपौर्णिमा – महिलांसाठी सामुहिक पूजेचे आयोजन .
६) आषाढी एकादशी – पूर्ण दिवस हरिनाम जागर आणि हरिदर्शन, सोहळा.
७) श्रावण- वद्य पंचमी. संस्थेचा वर्धापन दिन सोहळा आणि “पदविका प्रदान ” समारंभ, आणि जेष्ठ कीर्तनकारांचा सन्मान.
८) भाद्रपद – विद्यार्थ्यांची सराव कीर्तने . ( वर्ष २ रे.)ह,भ,प,अशोक उपाध्ये नासिक यांची कीर्तन सेवा.
९) अश्विन .- शारदीय नवरात्रोत्सव , भोंडला, सप्तशती पाठ . आणि कोजागिरी पौर्णिमा.
१०) कार्तिक. – कार्तिकी एकादशी सोहळा. हरिनाम जागर आणि हरिदर्शन,ह.भ.प.उदयराज गंधे नासिक,यांची कीर्तन सेवा .
११) मार्गशीर्ष – शु. ११. मोक्षदा एकादशी. गीताजयन्तीनिमित्त गीतापठण.श्री दत्त जयंती.
१२) पौष – मकर संक्रांती हळदीकुंकू आणि तिळगूळ समारोह.
१३) माघ- वद्य नवमी. दासनवमी निमित्त ” ग्रंथराज दासबोध ” पारायण सप्ताह.
१४)शालेय विद्यार्थ्यांची दासबोध व मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा , मोठ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा .
१५)फाल्गुन – ह.भ.प.प्रभाकर फणसे बोरीवली यांची कीर्तन सेवा. तृतीय वर्ष विद्यार्थी “प्रकल्प कीर्तने” सादरीकरण.
१६) नेहमीच्या दैनंदिन ” नारदीय कीर्तन ” सेवेखेरीज खास कीर्तनाचे व प्रवचनाचे आयोजन, या अंतर्गत रामदासी आणि वारकरी कीर्तनाची प्रात्यक्षिके .
१७) विविध संगीत, सुगम गायन, भजन आणि माहितीपूर्ण व्याख्यानांचे आयोजन.
१८) दादर खेरीज अन्य ठिकाणी कीर्तन महोत्सवांचे आयोजन. ( माजी विद्यार्थी व अन्य सहयोगी संस्थाच्या सहभागाने )

याशिवाय वेळोवेळी वनवासी कल्याण केंद्र, मुंबई गोरक्षण मंडळ, अनिरुद्ध संप्रदाय , स्वामी समर्थ परिवाराचे कार्यक्रम, संगीत संध्या इत्यादी अनेक कार्यक्रम संस्थेत होत असतात.

अधिक माहितीसाठी अन्य दालने पहा किंवा कार्यालयात संपर्क करा.

कार्तिकी एकादशीचा शानदार सोहळा

कार्तिक शु. ११ प्रबोधिनी एकादशी आणि संतश्रेष्ठ नामदेव महाराज जयंती निमित्ताने १३ नोव्हेंबर २०१३ रोजी विठ्ठल मंदिरात खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पहाटे ५ वाजता यजमानांचे हस्ते पूजा आणि ब्राह्मणांनी मंत्रजागर केला. विजेची रोषणाई, फुलांची आरास ,रांगोळ्या , तोरणे , झुंबर अशी सर्व सजावट दिसत होती. आणि सनईच्या मंगल ध्वनीने वातावरण भरून गेले होते. नवीन वस्त्रे आणि अलंकारांनी मूर्तींना वेगळे तेज प्राप्त झाले होते.

सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी एकाच गर्दी केली होती.संस्थेतर्फे तुलसी माला देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.अनेक कार्यकर्ते भाविक आणि परिसरातील विठ्ठल भक्त मदतीसाठी पुढे आले होते. दर्शन घेवून जाताना राजगिरा लाडूचा प्रसाद दिला जात होता. धार्मिक पुस्तकांची विक्री केंद्रे याचीही योजना केली होती.

दुपारी दादर फुल-बाजारातील वारकरी भाविकांनी प.पु. कृष्ण-महाराजांच्या पालखीसह दिंडी आणून मंदिरात भजनाचा कार्यक्रम सादर केला . महिलांच्या भक्तीसंगीताचा कार्यक्रमही झाला. त्यानंतर सुश्राव्य कीर्तन ह.भ.प. मंजिरी केळकर यांनी सादर केले. रात्री उशिरापर्यंत भाविक दर्शनाचा लाभ घेतच होते. व्यवस्थेचे काम श्री सुरेश उपाध्ये आणि श्री किशोर साठे यांनी उत्तम सांभाळले.

आगामी उपक्रम अणि योजना

संस्थेचे मुख्य उद्दिष्ट नारदीय कीर्तनाचा प्रचार, प्रसार आणि प्रशिक्षण हे असून ते पूर्ण करण्यासाठी संस्थेपुढे अनेक योजना कार्यान्वित करण्याचे स्वप्न आहे. कीर्तनाच्या माध्यमातून आजच्या माहिती महाजालाच्या वेगवान युगातही सामाजिक जागृतीसाठी प्रयत्न होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी संस्था सतत सर्वतोपरीने कार्य करीतच आहे. शिवाय संस्थेची काही दूरगामी ध्येये आहेत.आपणासारखे दानशूर आणि कीर्तन-प्रेमी भाविक आणि हितचिंतक संस्थेला या ध्येयासाठी सतत प्रेरणा देत राहतील असा विश्वास वाटतो.

आगामी योजना आणि कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही हे करू इच्छितो.

१) लहान खेड्यात कीर्तनकार पाठवून या माध्यमातून लोकशिक्षण आणि जनजागृती करणे.
२) गरजू लोकांसाठी आणि वन्य बांधवांसाठी धान्य कपडे आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे .
३) दुर्बल आणि गरजू कीर्तनकार आणि साथीदार मंडळीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करणे.
४) शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी कीर्तनाच्या माध्यमातून संस्कार आणि मार्गदर्शन.
५) समाजातील अप-प्रवृत्तीच्या निवारणासाठी नव्या कीर्तनाचे लेखन, प्रकाशन आणि सादरीकरण.
६)केंद्रीय आणि महाराष्ट्र राज्य सरकारी उपक्रम आणि समाज कल्याण योजनांना कीर्तन माध्यमातून सक्रीय मदत आणि सहकार्य करणे.
७)येणाऱ्या २०१४ वर्षी संस्था आपला ७५ वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा करीत आहे.या ” हीरक महोत्सवाच्या ” निमित्ताने संस्थेने अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच अनेक नवे उपक्रम आणि नवीन योजना सुरु करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
८) सध्या विजेचे दर सतत वाढत असल्याने त्या खर्चाला आवर घालण्यासाठी दादर येथील संस्थेच्या इमारतीत सौर उर्जेचे संयंत्र बसविणे.

( संस्थेवरील भक्त मंडळींच्या अतूट विश्वासामुळे आणि झपाटून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच संस्था आज ७५ व्या वर्षातही नव-नवीन उपक्रम हाती घेत आहे. आम्हाला नित्य प्रेरणा देणाऱ्या या संस्थेच्या इतिहासाची आणि कर्तबगार कार्यकर्त्यांची ओळख आपणास ” इतिहास ” आणि ” व्यवस्थापन ” या दालनात अवश्य होईल.)

वारकरी कीर्तनाचा खास कार्यक्रम

दि. २८,२९, आणि ३० ऑक्टो २०१३ रोजी अश्विन महिन्यात वारकरी कीर्तनाचा एक खास कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कौडीण्यापूर अमरावती येथील ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ आणि त्यांच्या सहकार्यांनी ३ दिवस दादर येथे विठ्ठल मंदिरात वारकरी कीर्तनाची सेवा करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. देवशोधन हा विषय निरूपणासाठी घेवून अनेक चटपटीत दृष्टांत आणि अभ्यासपूर्ण विवेचन यातून महाराजांनी ३ दिवस वारकरी कीर्तन पद्धतीने खरा देव कुठे ? आणि उत्तम भक्तीचे महत्व अगदी सखोलपणे मांडले.

या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. अभ्यासक म्हणून अश्या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती असावी अशी अपेक्षा आहे.

प्रगत कीर्तन सत्र एकची सांगता

प्रगत कीर्तन प्रशिक्षण योजनेतील सत्र एक अंतर्गत शेवटचे सादरीकरण शिबीर २६ व २७ ऑक्टो.२०१३ रोजी दादर येथे संपन्न झाले . आतापर्यंत या उपक्रमात अनेक नामवंत कीर्तनकारानी येऊन कीर्तनातले प्रगत स्तराचे मार्गदर्शन केले. नारदीय व रामदासी परंपरेतील पूर्वरंग आणि आख्यानाचा तसेच संगीताचा अभ्यास करून घेण्यात आला . भरपूर प्रात्यक्षिकासह झालेल्या या उपक्रमात सुमारे २५ नवोदित कीर्तनकारांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

दि. २६ व २७ ऑक्टो.२०१३ ला रविवारी दादर येथील संस्थेच्या विठ्ठल मंदिरात विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ५० मिनिटात स्वतःचे स्वतंत्र कीर्तन सादर केले.. नमनापासून ते शेवटच्या भैरवीपर्यंत सर्व प्रकार त्यानी समाविष्ट केले होते. प्रात्यक्षिकांचे निरीक्षण करण्यासाठी चिपळूणचे ह.भ.प. महेशबुवा काणे यांना आमंत्रित केले होते.या सादरीकरणासाठी “धर्माच्या करिता आम्हास जगती , रामानी धाडीयले . ” आणि “धर्माचे स्वरूप आणि आपले कर्तव्य ” असा विषय देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी धर्माचे विविध अर्थ पूर्वरंगात मांडून अनेक आख्याने सादर केली. स्वतंत्र लेखनासाठी चालना म्हणून या उपक्रमाचा चांगलाच लाभ झाला असे मनोगत अनेक प्रशिक्षणार्थी कीर्तनकार मंडळीनी प्रगट केले. श्री काणेबुवांनी या नंतर विद्यार्थ्यांना अनेक सूचना आणि मार्गदर्शन केले. २३ एकूण विद्यार्थ्यापैकी १९ जणांनी प्रगत कीर्तनाचे सादरीकरण केले. ४ प्रात्याक्षिके नंतर होणार आहेत.

यानंतर प्रगत कीर्तनाचे नवीन सत्र सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवेश इच्छुक कीर्तनकार मंडळीनी अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा.

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

संस्थेच्या सभागृहात सोमवार दि. ३० सप्टेंबर,२०१३ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. सुमारे ५० सभासदांनी सभेला सहभाग व सहकार्य दिले. संस्थेच्या कामकाजाबद्दल सभासदांनी आणि विश्वस्तांनी समाधान व्यक्त केले. अध्यक्ष. मुख्य विश्वस्त श्री. श्रीकांत कारुळकर तसेच जेष्ठ विश्वस्त श्री वसंतराव जोशी हेही उपस्थित होते. श्री सुरेश उपाध्ये, आणि कार्यवाह श्री किशोर साठे यांनी सभासदांच्या अनेक प्रश्नांचे समाधानपूर्वक निरसन केले. संस्थेच्या ७५ व्या वर्षी वर्धापन वर्षात करावयाच्या अनेक आगामी योजनांवर सभासदांनी सूचना केल्या त्या सर्व चर्चा होवून विचाराधीन ठेवण्यात आल्या. शेवटी पसायदानाने या सभेची सांगता झाली.

ह.भ.प. श्री. म.वि. तथा नानाबुवा जोशी . यांचा सन्मान

दरसाल संस्थेच्या वर्धापन दिवशी संस्था एका जेष्ठ कीर्तनकाराचा सन्मान काही विशिष्ठ निकषावर करीत असते. या वर्षी जेष्ठ आणि श्रेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. श्री . महादेव विनायक तथा नानाबुवा जोशी रत्नागिरी , यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह.भ.प. नानाबुवांचे एक कीर्तन श्रवणाचा लाभ यावेळी झाला. तसेच श्रावण वद्य पंचमीला (दि. २४ व २५ ऑगस्ट रोजी या वर्षीचे वर्धापन दिनी पदविका संप्रदान समारंभात ” कीर्तनालंकार ” पदविका त्यांच्याच हस्ते देण्यात आल्या. व सर्व तृतीय वर्ष उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मानचिन्हे देउन गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून गोरेगावच्या पाटकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. महारुद्र केकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

अलीकडेच म्हणजे दि. २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान दरसाल प्रमाणे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. सुमारे ५० भाविकांनी यात भाग घेतला. दिसेम्बर १ रोजी पहाटे महाराजांच्या समाधी सोहळ्याचे अभंगांचे गायन झाले. सकाळी १० ते १२ मध्ये काल्याचे कीर्तन ह.भ.प. सौ वंदना टिळक यांनी सदर केले. त्यालाही श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. सायंकाळी श्री. शीरगोपीकर लिखित ” धन्य ते आळंदी ” हा भक्तीगीतावर आधारीत संगीत कार्यक्रम सौ. उषा जोशी यांनी सादर केला. या सर्व कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश उपाध्ये आणि कार्यवाह श्री. किशोर साठे यांनी वेळोवेळी जरूर ते मार्गदर्शन केले. विशेष सांगायचे तर या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांकडून सहभाग सहकार्य आणि आर्थिक योगदान लाभले .

माजी विद्यार्थी कीर्तन महोत्सव

यावर्षी फेब्रु. १८ ते २८ दरम्यान संस्थेच्या माजी विद्यार्थी समूहाने एक कीर्तन महोत्सव सदर करण्याचे योजिले आहे. ११ दिवस होत असलेल्या या समारोहात अनेक जुन्या जाणत्या व नामवंत अश्या कीर्तनकारांची कीर्तने ऐकावयास मिळतील. कार्यक्रमाचे संयोजन पूर्ण झाल्याने आता अनेक माजी विद्यार्थी कीर्तनकार पुढील वर्षाच्या प्रतीक्षा यादीवर ठेवावे लागले असे संयोजकांकडून सांगण्यात आले आहे. कीर्तनप्रेमी आणि कीर्तनकारांचा वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद हे या उपक्रमाचे वैशिष्ठय आहे. नियोजित कार्यक्रमास आमच्या अनेकोत्तम शुभेच्छा.

दास नवमी निमित्त पाठांतर स्पर्धा

दासनवमी निमित्त मनाचे श्लोक आणि दासबोध निवडक ओव्यांची शालेय पाठांतर स्पर्धा तसेच मोठ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन या वर्षीही करण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे हा उपक्रम दादर आणि बोरीवली येथील अनेक शाळातून राबविण्यात येतो. त्याला उत्तम प्रतिसादही मिळतो.

३ गटात ही स्पर्धा घेण्यात येते. १ली ते ४थी साठी ५ मनाचे श्लोक आणि ५वी ते ७ वी आणि ८वी ते १० वी या गटासाठी दासबोधातील निवडक १० ओव्या पाठांतरासाठी दिल्या जातात. दोन्ही केंद्रावर प्रत्येकी सुमारे ४५० विद्यार्थ्यांचा सहभाग आणि स्थानिक समर्थ भक्तांचे सहकार्य हे या स्पर्धेचे वैशिष्ठय आहे.

समर्थ विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे आणि विद्यार्थ्यांना पाठांतराची आवड निर्माण करणे हेच मुख्य उद्देश ठेवून संस्था ही स्पर्धा घेत असते.