कीर्तन मधुकर सत्र ३ रे,शिबीर क्र.५

कीर्तन मधुकरचे ५ वे शिबीर संपन्न
दादर दि.२८/१०/२०१८
अखिल भारतीय कीर्तन संस्था , दादर मुंबई संचलित ” कीर्तन मधुकर ” या प्रगत अभ्यासाच्या  पाचव्या शिबीराची आज सांगता झाली. यावेळी परमआदरणीय ह.भ.प.श्री. नंदकुमार कर्वे गुरूजी मार्गदर्शक म्हणून लाभले होते.
मुंबईतील नामांकीत अखिल भारतीय कीर्तन संस्था संचलीत कीर्तन प्रशिक्षण  प्रगत वर्गाच्या दुसऱ्या सत्रातील दोन दिवसीय शिबीराची आज सांगता झाली .  यापूर्वी या अभ्यासक्रमाची प्रथम सत्रातील ४ शिबीरे संपन्न झाली असून त्यावेळी अनुक्रमे परमआदरणीय ह.भ.प.श्री. श्रीराम चितळेबुवा , ह.भ.प.श्री.महेशबुवा काणे , ह.भ.प.श्री.शरदबुवा घाग आणि ह.भ.प.श्री.वासुदेवबुवा बुरसे हे नामांकित कीर्तनकार मार्गदर्शक म्हणून लाभले होते. यावेळी परमआदरणीय  कीर्तनरत्न ह.भ.प.श्री.नंदकुमार बुवा कर्वे हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते. संगीत अलंकार , उत्तम संवादिनी वादक असलेले , अत्यंत शालिन , सर्जनशील आणि अभ्यासू कीर्तनकार म्हणून महाराष्ट्र आणि राज्याबाहेर ते सुप्रसिद्ध आहेत. कीर्तन करणाऱ्या  आणि कीर्तन जगणाऱ्या बुवांचे बहुमोल मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना दोन दिवसात लाभलं. छापील संहितेच्या बंधनात न रहाता गुरूजींनी दोन दिवस भरपूर ज्ञानदान केलं. दोन पूर्वरंग आणि दोन आख्यान अशी जणू मेजवानीच झाली.
यावर बुवांनी भरपूर मुद्दे पुरवले. बुवांचं संगीत क्षेत्रातील अनुभवी ज्ञान हात न आखडता प्रशिक्षणार्थींना दिलं. ” कायम विद्यार्थी रहाल तर तुम्हाला भरपूर गुरू भेटतील परंतु तुम्ही गुरू झालात की तुम्हाला गुरू भेटणार नाहीत ” हा बुवांना त्यांच्या गुरूजींनी दिलेला गुरूमंत्र बुवांनी प्रशिक्षणार्थींना दिला. मनमोकळेपणाने आणि नम्रपणे आपल्याला प्राप्त ज्ञान दुसऱ्यांना देण्याच्या बुवांच्या स्वभावाचे दर्शन झालं. तसेच वयाने आणि अनुभवाने लहान व नवोदित कीर्तनकारांशी देखील प्रेमाने आणि आदाराने वागणारे बुवा दैनंदिन जीवनात कीर्तन जगतात याची जाणीव झाली. जाता जाता बुवांनी अत्यंत महत्त्वाचा गुरूसंदेश दिला ,” स्वतःसाठी जगाल आणि जळाल तर राख होईल , मात्र समाजासाठी जगाल आणि जळाल तर विभुती होईल .”  अत्यंत खेळीमेळीत दोन दिवस चाललेल्या या शिबीराची सांगता झाली तबला साथ श्री.श्रीधर बोडस  व संवादिनी साथ श्री. प्रकाश सोहनी यांनी नेहमीच्या लौकिकाला साजेशीच  दिली. नेहमी प्रमाणे संस्थेने खानपान व्यवस्था चोख केली होती.त्याबद्दल श्री.उपाध्येसर , श्री.परबगुरूजी , सौ.उमाताई , श्री.रमेश पोतदार व त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार.
सायंकाळी दिवंगत गुरूजनांचे स्मृतीप्रित्यर्थ झालेल्या वार्षिक  कार्यक्रमात ह.भ.प.श्री कर्वे  गुरूजींच्याच विशेष कीर्तनाचा लाभ झाला. संगीत क्षेत्रातील महामेरू पंडित  पलुस्कर यांचं आख्यान म्हणजे प्रशिक्षणार्थींना आनंदाची पर्वणीच ठरली.
🙏🏼धन्यवाद,
 संकलन आणि शब्दांकन..
हर्षद माजरेकर
पनवेल.

Leave a Reply