वर्धापनदिन.

श्रावण वद्य पंचमी हा संस्थेचा वर्धापन दिन. या वर्षीही मोठ्या उत्साहात आणि आनंददायक वातावरणात संपन्न झाला.

सोहळा कीर्तनकारांचा
दरवर्षी  श्रावण वद्य पंचमी हा एक विशेष दिवस.. आमच्या “मुंबईकर कीर्तनकारांच्या ” आयुष्यातला सुवर्ण दिवस. कारण या दिवशी तीन वर्षांचा अखिल भारतीय कीर्तन संस्थेचा शैक्षणिक सहवास संपून आयुष्यातील मोठी शिदोरी हाती घेऊन आम्ही समाजाच्या प्रबोधनासाठी बाहेर पडतो. या माध्यमातून काही चांगले यथाशक्ती यथामती,शिकवण्यासाठी आणि समाजाकडून काही शिकण्यासाठी सुद्धा, कीर्तन करावे या उद्देशाने जगाच्या प्रांगणात उतरलेले आम्ही सगळे नवोदित कीर्तनकार म्हणून….. खऱ्या अर्थाने शैक्षणिक मान्यता प्राप्त झालेले असे आम्ही हरिदास, संस्थेतून प्रेरणा घेवून बाहेर पडतो  ते एका नव्या उत्साहाचे वारे घेवूनच.
 नव्या आशा, नव्या दिशा, काही स्वप्ने , सगळीच नाविन्याची पर्वणी वाटते  आम्हाला.या वर्षी ३१ ऑगस्ट २०१८ शुक्रवारी  हा सोहळा विठ्ठल मंदिरात दर वर्षाप्रमाणे  मोठ्या थाटात पार पडला.
 सोहळ्याचं वर्णन काय करावं, कसं करावं ?. अपूर्व आणि अद्भुत  हे शब्दही कमी पडतील. असाच अभूतपूर्व सोहळा होता तो. कधीही विसरता न येण्याजोगा.  सुरवातीचे स्वागत पद्य,नारद गौरव गीत, संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुरेल गायले. सगळ्या सोहळ्याचे ,संयोजन दुसर्या व तिसऱ्या वर्षीच्या सहध्यायानी केले होते.
  प्रास्तविक भाषणात उपाध्ये सरांनी संस्थेतर्फे चालविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली . त्यानंतर व्यासपीठावरील सर्वांचे मनोगत सादर झाले. विद्यार्थ्याचेही अनुभव  व्यक्त झाले. संस्थेबद्दलचा आदर प्रत्येकाच्या भाषणातून अनुभवायला मिळाला. व्यासपीठावर  आमचा गुरुजन वर्ग, श्री पटवर्धन सर श्रीमती उमा ताई, श्रीमती वैशंपायन बाई आणि देशमुख सर,संगीत शिक्षिका  सौ वावीकर ,यांच्या उपस्थितीत  श्री गंगाधर बुवांच्या हस्ते पदवीदान समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. बुवांच्या हस्ते सर्व ” विशारद ” झालेल्या,व  “कीर्तनालंकार” परीक्षा उत्तीर्ण  झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ,शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ, संस्थेचं मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असलेले जेष्ठ आणि श्रेष्ठ असे डोंबिवलीचे कीर्तनकार ह.भ.प.श्री. गंगाधरबुवा  व्यास यांच्या अमृततुल्य वाणीतून निघालेलं रसाळ विद्वत्तापूर्ण पायस आम्ही आकंठ प्राशन केलं. सर्वांच्या चेहर्यावर समाधान झळकत होतं. बुवांनी केलेल्या मार्गदर्शनाला तोड नाही.संस्थेतर्फे कीर्तन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. श्री गंगाधर बुवांना  शाल,श्रीफळ आणि सन्मानपत्र देण्यात आले. दादरच्या असंख्य भक्त मंडळीनी आणि संस्थेच्या हितचिंतक सज्जनांनी, तसेच संस्थेच्या आजी व माजी विद्यार्थ्यांनी  या समारंभास आवर्जून हजेरी लावली होती.
 संस्थेने केल्या सन्मानाबद्दल प्रतिसाद म्हणून  मन हेलावून टाकणारं अध्यक्षीय मनोगत बुवांनी व्यक्त केले आणि नवोदित कीर्तनकाराना यथायोग्य उपदेशही केला. अगदी आयुष्यभर लक्षात राहील अस हे मनोगत  झालं. आणि या बहारदार सोहळ्याची सांगता श्री.ज्ञानेश्वर  माउलीच्या  पसायदानाने   झाली.
कार्यक्रमासाठी  सर्व विश्वस्त,का. मंडळाचे पदाधिकारी, अध्यक्ष श्री उपाध्ये सर,कार्यवाह श्री साठे, श्री परब सर, श्री रमेश आणि इतर सेवक वर्ग,कार्यकर्ते  यांनी अपार  मेहनत घेतली .
———-.——-.——.———-
वृत्त संपादन व शब्दांकन.
सौ. गीतांजली (पटवर्धन) तावडे.
विरार,जि.पालघर.

Leave a Reply