आषाढी एकादशी सोहळा

मंगळवार दिनांक ४ जुलै २०१७ रोजी “देव शयनी ” आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे कीर्तन संस्थेचे सभागार आणि सर्व परिसर सुशोभित करण्यात आला होता. रांगोळ्या दीपमाला, तोरणे सर्वत्र लावली होती.सुमधुर संगीताच्या सुरांनी परिसराला जाग आली. पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत षोडशोपचार अभिषेक व यथासांग पूजा करण्यात आली. पूजेचे पौरोहित्य श्री जोशी गुरुजींनी केले.
संत तुकारामांनी मुंबईत वडाळ्याच्या विठोबाचे मंदिर स्थापन केले तेच महत्व दादरच्या या मंदिराला आज लाभले होते. जोरदार पावसाची वृष्टी असूनही भाविकांची गर्दी होतीच. संस्थेने पूजेसाठी भाविकांना तुलसीपत्र देण्याची व्यवस्था केली होती. प्रसाद वितरणाची सर्व व्यवस्था संस्थेचे कार्यकर्ते आणि परिसरातील भाविक यांनी उत्तम सांभाळली होती. सायंकाळी ह.भ.प. अविनाश परांजपे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.

दादर फुलबाजारातील व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग देवू केला होता. एका दिंडीचे आयोजन ही मंडळी दर वर्षी करीत असतात हेही एक विशेष आकर्षण असते.माहीमच्या अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी मंदिराला भेट देवून प्रार्थना केली.

अनेक भाविकांनी संस्थेला या निमित्ताने आर्थिक मदत देवू केली. गेल्या ७६ वर्षांच्या काळात भाविकांच्या भक्कम पाठींब्यावर संस्था आपले कीर्तन प्रशिक्षणाचे कार्य अधिकाधिक उत्तम रीतीने पुढे नेत आहे.हे एक केवळ मंदिर नाही तर एक आदर्श “सांस्कृतिक केंद्र” व्हावे अशी इच्छा अनेक भाविकांनी व्यक्त केली.संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेश उपाध्ये आणि सरकार्यवाह श्री. किशोर साठे तसेच अनेक आजी-माजी विद्यार्थी आणि भाविक यांनी या सोहळ्यासाठी सर्व सहकार्य केले.

Leave a Reply